Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 9 June, 2011

काजूमळ साळेरी येथील प्राथमिक शाळा पुन्हा सुरू

काणकोण, दि. ८ (प्रतिनिधी): गुरुकुल शैक्षणिक सोसायटी खोला या संस्थेने २००८ साली कमी पटसंख्येमुळे बंद पडलेली काजूमळ साळेरी येथील उच्च प्राथमिक शाळा पुन्हा सुरू केली आहे. खोला विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हा निर्णय सोसायटीने घेतल्याचे समजते.
काजूमळ येथील शासकीय उच्च प्राथमिक शाळा २००८ साली विद्यार्थ्यांच्या कमी पटसंख्येमुळे सरकारतर्फे बंद करण्यात आली होती. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना अन्य शाळेत नोंदणी करणे भाग पडले होते. संस्थेचे अध्यक्ष जिल्हा पंचायत सदस्य कृष्णा वेळीप यांनी सांगितले की, खोला पंचायत क्षेत्रातील दुर्गम भाग हा शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे. ज्या पालकांना आपली मुले शिकावीशी वाटतात, अशा मुलांसाठी ५ ते ६ किमी दूर शाळा असल्याने ती मुले शिक्षणात मागे राहतात. यामुळे गुरुकुल सोसायटीने गेल्यावर्षीच शाळा सुरू करण्याचे ठरवले होते. मात्र सरकारची मान्यता उशिरा मिळाल्याने यंदा शाळा सुरू करावी लागली.
कुडय, आमडे, साळेरी, पोपये-दांडो, वागोण, माटवेमळ, खोला अशा सात प्राथमिक शाळांतून ४१ विद्यार्थी पाचवीसाठी नोंदणी करणार असून आजपर्यंत २१ विद्यार्थ्यांनी नोंद केलेली आहे. उर्वरित विद्यार्थी येत्या काही दिवसांत नोंद करतील. सध्या शाळेला पाचवी ते सातवीपर्यंत मान्यता मिळालेली आहे. यानंतर आठवीसाठी मान्यता मिळवून दहावीपर्यंत विद्यार्थ्यांची सोय करण्याचा संस्थेचा विचार असल्याचे श्री. वेळीप यावेळी म्हणाले.
२००७ सालापर्यंत काजूमळ येथील शाळा सरकारतर्फे चालू होती. मात्र या शाळेकडे काही कारणास्तव दुर्लक्ष झाले व विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली. यापुढे शाळेत विविध सोई सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच क्रीडांगणही उपलब्ध करून देणार असल्याचे श्री. वेळीप यांनी ‘गोवादूतला’ सांगितले.

No comments: