Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 14 May, 2011

नीलेशवर हल्ला करणार्‍यांना चोवीस तासांत अटक करा

पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): कावरे खाणी विरुद्ध लढा देणार्‍या नीलेश गावकर याच्यावर प्राणघातक हल्ला करणार्‍या हल्लेखोरांना आणि संबंधित खाण मालकाला येत्या चोवीस तासात अटक करण्याची मागणी आज स्वामी अग्निवेश, किरण बेदी आणि अरविंद केजरीवाल यांनी केली. तसेच, या विषयीचे एक पत्रही पोलिस महासंचालक डॉ. आदित्य आर्य यांना लिहिण्यात आले असून आरोपीला पकडून पोलिसांनी आपली कर्तबगारी सिद्ध करावी, असे आव्हानही पोलिस खात्याला देण्यात आले आहे.
नीलेश गावकरवरील हल्ला हा संपूर्ण गोमंतकीयांवर झालेला हल्ला आहे. खाण माफिया कोण आहेत हे सर्वांना माहिती आहे. परंतु, त्यांना अटक केली जात नाही. कावरे खाण केवळ कागदोपत्री बंद केली गेली आहे; प्रत्यक्षात ती सुरूच आहे. येत्या २४ तासांत ती खाण बंद केली जावी, अशा इशारा यावेळी श्री. केजरीवाल यांनी दिला.
धनवान व्यक्ती गरिबावर हल्ला करते तेव्हा तो गुन्हा ‘अज्ञात व्यक्तीवर’ नोंद होतो. नीलेश गावकर हा अण्णा हजारे यांचा सच्चा शिपाई आहे, असेही केजरीवाल म्हणाले. सध्या नीलेश याच्यावर हॉस्पिसियो इस्पितळात उपचार सुरू असून आज दुपारी स्वामी अग्निवेश व अरविंद केजरीवाल यांनी त्याची इस्पितळात जाऊन भेट घेतली.
-------------------------------------------------------
नीलेश गावकरवर हल्ला करणार्‍यांना त्वरित अटक करण्याच्या निवेदनावर जाहीर सभा सुरू असताना आयआयटीचे माजी प्राध्यापक डॉ. प्रमोद पाठक यांनी केवळ अर्ध्या तासात पाचशे जणांच्या सह्या घेतल्या. या निवेदनावर माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनीही सही केली.

No comments: