Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 8 May, 2011

तेरेखोल जमीन विक्रीत महसूल खाते भागीदार

अनेक बड्या धेंडांचाही सहभाग

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी)
तेरेखोल गावच्या जमीन विक्री व्यवहारात येथील स्थानिक युवा उद्योजक सचिन परब हे केवळ हिमनगाचे एक टोक आहे. या व्यवहारात अनेक बडी धेंडेही सामील असल्याची टीका सेंट ऍँथनी कूळ व मुंडकार संघटनेतर्फे करण्यात आली आहे. पेडणेचे मामलेदार व उपजिल्हाधिकारी यांना हाताशी धरून हा व्यवहार सुरू आहे व त्याला महसूल खात्याचाही वरदहस्त लाभल्याने आता उच्च न्यायालयात धाव घेण्यावाचून तरणोपाय नाही, असा निर्धारही या संघटनेने व्यक्त केला.
तेरेखोल गावचा ताबा मिळवण्यासाठी ‘लीडिंग हॉटेल्स’कडून सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे येथील स्थानिक लोक पेटून उठले आहेत. आता पर्यटन खात्यातर्फे या गावात ‘गोल्फ कोर्स’ उभारण्याची योजनाही जाहीर करण्यात आल्याने स्थानिकांना देशोधडीला लावून हा गावच पर्यटन व्यवसायाच्या नावाने कंपनीच्या घशात घालण्याचा डाव आखण्यात आल्याचे या आंदोलनाचे नेतृत्व करणारे फ्रान्सिस रॉड्रिगीस यांनी म्हटले आहे. या संपूर्ण व्यवहाराची इत्थंभूत माहिती आपण स्वतः महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा यांच्या कानावर घातल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या व्यवहारात गौडबंगाल झाल्याची कागदपत्रेच त्यांच्यासमोर ठेवण्यात आली. परंतु, त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही, अशी नाराजी त्यांनी बोलून दाखवली.
‘लीडिंग हॉटेल्स’ कंपनीकडून सत्ताधारी नेत्यांना हाताशी धरूनच हा जमिनी खरेदी करण्याचा व्यवहार सुरू आहे व त्यामुळे स्थानिकांचा विरोध मोडून काढण्याचेही षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. एका मर्यादित जागेत एखादा प्रकल्प उभा राहत असेल तर गोष्ट अलाहिदा; परंतु संपूर्ण गावच आपल्या ताब्यात घेऊन हजारो वर्षांपासून इथे वास्तव्य करणार्‍या लोकांना देशोधडीला पाठवण्याचे प्रकार घडावेत ही माणुसकीला कलंक लावण्याचीच कृती आहे, असा घणाघाती टोलाही त्यांनी लगावला आहे.
पेडणेचे मामलेदार व उपजिल्हाधिकारी हे या हॉटेल कंपनीचे ‘एजंट’ म्हणूनच वावरत आहेत व त्यांच्याकडून ज्या पद्धतीने येथील लोकांची सतावणूक सुरू आहे त्याविरोधात लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती श्री. रॉड्रिगीस यांनी दिली. मुळात ‘लीडिंग हॉटेल्स’ कंपनीकडून खलप बंधूंकडे करण्यात आलेला जमीन विक्री व्यवहारच बेकायदा असून हे विक्रीपत्र रद्द करण्यात यावे, यासाठीही वेगळी याचिका आपण दाखल करू, असेही ते म्हणाले.

No comments: