Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 23 March, 2011

निर्णय शिक्षणमंत्र्यांच्या कुवतीबाहेर - पुंडलीक नायक

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी)
दिगंबर कामत सरकारमध्ये शिक्षणमंत्री म्हणून काम पाहणारे बाबूश मोन्सेरात यांची शैक्षणिक पात्रता काय आहे हे सारे गोवेकर जाणतात. त्यांची शैक्षणिक क्षमता व सामाजिक भान पाहता गोव्यातील प्राथमिक शाळांत कोणत्या भाषेतून शिक्षण द्यावे, हा नाजूक व तेवढाच दूरगामी परिणामांना जन्म देणारा निर्णय घेणे शिक्षणमंत्र्यांच्या शक्य आहे का, असा सरळ सवाल प्रसिद्ध लेखक, विचारवंत तथा ज्येष्ठ नाटककार पुंडलीक नायक यांनी उपस्थित केला आहे.
गोव्यात सध्या गाजत असलेल्या प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाविषयी श्री. नायक यांनी आपली मते मांडताना वरील प्रतिपादन केले. ते म्हणाले की, शिक्षण हे मुलांचे भवितव्य घडवणारी प्रक्रिया आहे. शिक्षणावरून त्या त्या राज्याचे सामाजिक व सांस्कृतिक धोरण ठरत असते. त्यामुळेच प्रादेशिक भाषांतूनच प्राथमिक शिक्षण देण्याची गरज आहे.
शिक्षण ही अतिशय नाजूक गोष्ट असल्यामुळे ती हळुवारपणे व विलक्षण दक्षतेने हाताळण्याची गरज आहे. प्राथमिक शिक्षण हे तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा पायाच आहे. अलीकडेच पणजी महापालिका निवडणूक जिंकल्यानंतर शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दारूच्या बाटल्या हातात घेऊन मिरवणूक काढली होती ही त्यांची कृती संस्कृतिरक्षक राज्यकर्त्यांची खचितच नाही. त्यांना महापालिका आणि शिक्षणक्षेत्र हे जर एकसारखेच वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम असून त्यांनी शिक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयावर न बोललेलेच बरे, असा टोलाही श्री. नायक यांनी लगावला.
जे लोक सध्या इंग्रजी माध्यमाचा आग्रह धरत आहेत त्या इंग्रजीधार्जिण्यांना गोव्यात पुन्हा एकदा वसाहतवाद आणायचा आहे. त्यांचा कावा यशस्वी होऊ दिल्यास ही वसाहतवादी वृत्ती गोव्याचा पुढील काळात घात करणार आहे. भारताने परकीय राजवट १५० वर्षे अनुभवली असली तरी गोव्याने तब्बल ४५० वर्षे पारतंत्र्य भोगले आहे. त्यामुळे येथे वसाहतवादी वृत्तीच्या माणसांचा भरणा अजूनही आहे, असे विश्‍लेषण करतानाच श्री. नायक म्हणाले की, राष्ट्रवाद जोपासणारे त्रिस्तांव ब्रागांझ कुन्हा यांनी सांगितल्याप्रमाणे येथील लोकांनी पाश्‍चिमात्यांकडून ख्रिस्ती धर्म स्वीकारला असला तरी पाश्‍चिमात्य संस्कृती कदापि स्वीकारलेली नाही! आम्ही तनामनाने देशीच राहिलो असून या देशातील सर्व नियम आम्हांलाही लागू आहेतच. कुन्हा यांच्या या बोलण्याची आठवण सध्याच्या ख्रिस्ती बांधवांनी ठेवायला हवी, असेही त्यांनी सांगितले.
देवनागरी लिपी व राष्ट्रवाद यांचा अगदी जवळचा सबंध असून मुलांचे प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून व्हावे हा जागतिक सिद्धांत आहे. असे असताना काही इंग्रजीधार्जिणे गोव्याचे पूर्णपणे ‘इंग्रजीकरण’ करून गोव्यातून देवनागरी लिपीलाच संपवू पाहत आहेत. दुर्दैवाने बहुसंख्य असूनही कोकणी - मराठीप्रेमींत एकी नाही व अल्पसंख्याक असलेल्या इंग्रजीच्या समर्थकांत ती आहे व याचाच फायदा ते घेत आहेत, असे परखड निरीक्षणही त्यांनी नोंदवले. स्वार्थी राज्यकर्त्यांची त्यांना साथ मिळत आहे, असे सांगून कोकणी व मराठी समर्थकांनी देवनागरी लिपीच्या रक्षणासाठी एकत्र येऊन इंग्रजी समर्थकांचे मनसुबे धुळीला मिळवण्याची गरज आहे, असे आवाहन शेवटी श्री. नायक यांनी केले.

No comments: