Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 22 March, 2011

भारतीय नेत्यांकडून दिशाभूल ‘विकिलीक्स’चा आरोप

नवी दिल्ली, दि. २१
संसदेत २००८ साली विश्‍वासदर्शक ठरावावेळी काही खासदारांना लाच दिल्याप्रकरणी अमेरिकी राजदूतांनी आपल्या सरकारला पाठविलेल्या संदेशाबद्दल शंका व्यक्त करून, भारतीय नेते जनतेमध्ये गैरसमज निर्माण करीत आहेत, असा आरोप विकिलीक्सचे संपादक ज्युलियान असान्ज यांनी केला आहे. हे संदेश म्हणजे अमेरिकी राजदूतांची मते असल्याचे म्हणणे चुकीचे आहे. हे संदेश अधिकृतरीत्या आणि अधिकृत पदावर राहून पाठविलेली माहिती असून ती सत्य असावीच लागते. यात व्यक्त झालेली मते ही बाब वेगळी आहे, असे एनडीटीव्हीचे प्रणव रॉय यांना दिलेल्या मुलाखतीत असान्ज यांनी म्हटले आहे.
विश्‍वासमत जिंकण्यासाठी कॉंग्रेसने काही खासदारांना दिलेल्या लाचप्रकरणी अमेरिकी दूतावासाने पाठविलेल्या अहवालात असत्य कळविण्याचे कारणच नव्हते, असे सांगून पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग सध्या जी निवेदने करून त्याबद्दल संशय व्यक्त करीत आहेत आणि जगात ही माहिती विश्‍वासार्ह नसल्याचे सांगत आहेत ते खरे नाही; यातून डॉ. सिंग भारतीय जनतेची दिशाभूल करीत असल्याचे असान्ज यांनी सांगितले.

No comments: