Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 25 November, 2010

आंध्र प्रदेशचे नवे मुख्यमंत्री किरण रेड्डी

हैदराबाद, दि. २४ -आज सकाळी झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री के. रोसय्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, तर दिवसभराच्या राजकीय हालचालीनंतर रात्री विधानसभा अध्यक्ष किरण रेड्डी यांची मवे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. पक्षातर्फे अर्थमंत्री प्रणव मुखर्जी, विधिमंत्री वीरप्पा मोईली, संरक्षणमंत्री ए. के. ऍण्टोनी आणि आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद हे वरिष्ठ नेते पर्यवेक्षक म्हणून दाखल झाले आहेत. वेगळ्या तेलंगणासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अंतिम अहवाल येण्यापूर्वी तेलंगणासाठी कॉंग्रेसकडून देण्यात येणाऱ्या विशेष पॅकेजचा हा एक भाग असल्याचे बोलले जात आहे.
"काही वैयक्तिक कारणांमुळे मी आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. यामागे कुठलेही राजकीय कारण नाही हे मी तुम्हाला मनापासून सांगू इच्छितो', असे रोसय्या यांनी आपला राजीनामा राज्यपाल ई. एस. एल. नरसिंहन यांच्याकडे सुपूर्द करण्याआधी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली त्यावेळीच माझे वय खूप झाले होते. त्यानंतरही मी मुख्यमंत्रिपद स्वीकारले. ही जबाबदारी पार पाडत असताना माझ्या खांद्यांवर खूप ओझे असतानाही पूर्ण क्षमतेने कार्य करण्याचा मी प्रयत्न केला, असेही त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या अकाली निधनानंतर तात्पुरती व्यवस्था म्हणून रोसय्या यांना मुख्यमंत्रिपद बहाल करण्यात आले होते. रोसय्या काल नवी दिल्लीत होते. यावेळी झालेल्या भेटीतच पक्षश्रेष्ठींने त्यांना आपल्या निर्णयाची कल्पना दिली होती. नव्या नेत्याची निवड करण्यासाठी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक हैदराबाद येथे रात्री झाली.

No comments: