Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 28 October, 2010

जुझे फिलिप डिसोझांसह ८७ जणांविरुद्ध गुन्हा नोंद

मिकी मारहाणप्रकरण
वास्को, दि. २७ (प्रतिनिधी)ः येथील एका हॉटेलमध्ये आमदार मिकी पाशेको यांना झालेल्या मारहाणप्रकरणी महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा यांच्यासह अन्य ८७ जणांविरुद्ध मारहाण केल्याबद्दल गुन्हा नोंद करण्यात आला आहे. माजी पर्यटन मंत्री तथा बाणावलीचे आमदार मिकी पाशेको यांना मारहाण झाल्याचे वैद्यकीय तपासणी अहवालात सिद्ध झाल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक रोहिदास पत्रे यांनी दिली.
मंगळवारी रात्री ८.३० च्या सुमारास मिकी पाशेको आपल्या मित्रांसोबत येथील एका नामवंत हॉटेलमध्ये जेवण घेण्यासाठी आले असता मंत्री जुझे फिलिप डिसोझा यांनी त्या ठिकाणी येऊन पाशेको यांच्याशी हुज्जत घालून मारहाण केली. यानंतर जुझे फिलिप यांच्या समर्थकांनी मिकींच्या मित्राच्या गाडीची नासधूस केली. घटनेनंतर मंत्री जुझे फिलिप यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह वास्को पोलिस स्थानकावर मोर्चा नेला. पालिका निवडणुकीत आपल्या समर्थकांना पाडण्यासाठी मिकी यांनी पैसे वाटल्याचा आरोप त्यांनी केला. बाळकृष्ण साळगावकर व अन्य काही कार्यकर्त्यांनी वास्को पोलिस स्थानकावर आपली लेखी तक्रार दिल्यानंतर वास्को पोलिसांनी मिकी यांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंद केला असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक रोहिदास पत्रे यांनी दिली.
मिकी यांना मारहाण झाल्याची माहिती मिळताच त्यांचे शेकडो समर्थक उशिरा रात्री वास्को पोलिस स्थानकाजवळ दाखल झाले. यावेळी पोलिस स्थानकाबाहेर कडक सुरक्षा बंदोबस्तही करण्यात आला होता.
आज पोलिस उपअधीक्षक रोहिदास पत्रे यांना संपर्क केला असता, मिकी पाशेको यांना मारहाण व त्यांच्या मित्राच्या गाडीची तोडफोड केल्याप्रकरणी ८८ जणांवर भा.दं.सं. १४२, १४७, ३२३, ५०४ कलमाखाली गुन्हा नोंद केल्याची माहिती त्यांनी दिली. मंत्री जुझे फिलिप डिसोझा यांच्याबरोबर अँथनी फर्नांडिस, क्रीतेश गावकर, पाशांव मोंतेरो, बाबू नानोस्कर, बाळू साळगावकर, वहीद शेख, सलीम अट्ल्या व अन्य ८० अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मिकींना मारहाण केल्याची तक्रार घटनेच्या वेळी मिकींबरोबर असलेल्या सायमन परेरा, एडविन कार्व्हालो, मारियान फर्नांडिस व डायगो परेरा यांनी सादर केली. मिकी ज्या गाडीत आले होते ती गाडी डायगो परेरा यांची असल्याने तिची तोडफोड केल्याबाबत त्यांनी वेगळी तक्रार दिली आहे.
दरम्यान, मिकी वास्कोच्या त्या हॉटेलमध्ये पैसे वाटण्यासाठी आल्याची तक्रार जुझे फिलिप यांच्या काही कार्यकर्त्यांनी केल्याने त्याबाबत अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याच्या प्रती संबंधित अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या आहेत. पुढील तपास सुरू असल्याचे उपअधीक्षक पत्रे यांनी शेवटी सांगितले.

No comments: