Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 5 August, 2010

मिरामार ओव्हरब्रिज कंत्राटात घोटाळा विरोधकांचा जोरदार आरोप

संबंधितांवर कठोर कारवाईचे मंत्र्यांचे आश्वासन
पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): पणजी महापालिकेने मिरामार येथे शारदामंदीर शाळेसमोर हाती घेतलेल्या ओव्हरब्रिजच्या कंत्राटात भानगडी झाल्या असून त्यासंदर्भात महिनाभरात पालिका आयुक्त व इतर जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन नगरविकासमंत्री ज्योकिम आलेमाव यांनी आज विधानसभेत दिले. फातोर्ड्याचे आमदार दामू नाईक यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला विचारलेल्या एका तारांकित प्रश्नाला मंत्री उत्तर देत होते. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी यावेळी मंत्र्यांवर अनेक प्रश्नांचा भडिमार करत पणजी महापालिकेतील या सर्रास भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
शारदामंदीर शाळेसमोर "पीपीपी' तत्त्वावर १ कोटी ४० लाख रुपये खर्चाचे ओव्हरब्रिजचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र त्यासाठी कोणत्याही मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करण्यात आलेला नाही. पालिकेतील काहींच्या "आले मनात आणि काढून दिले कोट्यवधी रुपयांच्या कामाचे कंत्राट' असा हा एकूण मामला आहे. असे अनेक प्रकार या पालिकेत गेल्या काही वर्षापासून सुरू असून दिवसेंदिवस ही बजबजपुरी वाढतच चालली आहे. मंत्री कारवाई करण्याचे आश्वासन देतात; प्रत्यक्षात कारवाई होतच नाही. त्यामुळे कोणावर कोणाचा वचक नाही. हे काम देण्यापूर्वी पालिकेने "पीपीपी' तत्त्वावर कोटेशन मागवले होते. अशी सार्वजनिक स्तरावरील कोणतीही कामे कोटेशन पद्धतीवर देण्याची पद्धत नाही. राज्य सरकारचे त्यासंदर्भात स्पष्ट निर्देश आहेतच; परंतु नियोजन आयोगानेही या बाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहे. या गोष्टींची कल्पना एकवेळ तेथील राज्यकर्त्यांना नसली तरी चालेल; परंतु आयुक्त हे सरकारी अधिकारी असल्याने निदान त्यांना तरी नियम माहीत आहेत. मग या कामाला अशा पद्धतीने मंजुरी कशी देण्यात आली, असा संतप्त सवाल श्री. पर्रीकर यांनी केला.
पणजी महापालिकेत इतके घोटाळे आहेत. सगळीकडे लुटालूट सुरू आहे. या भानगडी इतक्या आहेत की, एका माणसाला त्या विधानसभेत मांडणे शक्य नाही. अशावेळी आपण या पालिकेच्या अनेक प्रश्नांची वर्गवारी करून ते इतर सदस्यांकडे सोपवले. त्यांच्याकडून हे प्रश्न पुढे आणण्याची तरतूद केली. जे लोक या ओव्हरब्रिज प्रकरणी दोषी आहेत त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई होणे काळाची गरज असून मंत्र्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण करावे, अशी मागणीही पर्रीकरांनी केली.
मंत्री ज्योकिम आलेमाव यांनी दामू नाईक, विजय पै खोत व पर्रीकर यांच्या तिखट माऱ्यातून कसाबसा श्वास घेत तेथे जे काही चालले आहे ते गोव्यातील सगळ्याच पालिकांच्या लौकिकाला काळिमा फासणारे असून पणजी पालिकेमुळे सर्वच पालिकांचे नाव बदनाम होत असल्याचे सांगितले. आता कठोर कारवाई करावीच लागेल आणि ती निश्चितपणे केली जाईल. महापालिकेत बऱ्याच काळापासून भ्रष्टाचाराचे प्रकार सुरू आहेत याची आपणास कल्पना असल्याचेही ते म्हणाले. ओव्हरब्रिजचे काम देतानाही पालिकेने बेकायदा पद्धत अवलंबली आहे. निदान आयुक्तांनी तरी पालिकेला गैरकारभार करण्यापासून रोखायला हवे होते; परंतु त्यांनी काहीच केले नाही. अशावेळी इतरांवर तर कारवाई होईलच; त्याचबरोबर आयुक्तांवरही महिनाभरात कठोर कारवाई केली जाईल, असे ठोस आश्वासनही मंत्री ज्योकिम आलेमाव यांनी शेवटी दिले.

No comments: