Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 2 August, 2010

महागाईवरून निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी प्रणवदांचा पुढाकार

आज दिल्लीत सर्वपक्षीय "ब्रेकफास्ट' बैठक

नवी दिल्ली, दि. १ - संसदेत महागाईच्या मुद्यावरून ठप्प झालेले कामकाज लक्षात घेता या विषयावरील कोंडी फोडण्याचा प्रयत्न म्हणून केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी उद्या (सोमवारी) सर्वपक्षीय नेत्यांना बैठकीसाठी पाचारण केले आहे.
श्री. मुखर्जी यांनी उद्या सकाळी सर्व पक्षांच्या नेत्यांना सकाळी "ब्रेकफास्ट' बैठकीसाठी बोलावणे पाठवले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांत सध्या महागाईच्या मुद्यावरून प्रचंड कोंडी झाली आहे. विरोधी पक्षाला महागाईच्या मुद्यावर मतदानासह चर्चा हवी आहे; मात्र सरकार मतदानाच्या नियमांतर्गत चर्चेसाठी तयार नाही. या कारणाने अधिवेशनाचा पहिला आठवडा अक्षरश: वाया गेला. त्यामुळे सुमारे ३८ कोटी रुपये अक्षरशः पाण्यात गेल्याचे सांगितले जात आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या नव्या आठवड्यातही याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी अर्थमंत्र्यांनी हा पुढाकार घेतला आहे.
या बैठकीला लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या श्रीमती सुषमा स्वराज (भाजप) , जनता दल युनायटेडचे अध्यक्ष व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे निमंत्रक शरद यादव, समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंग यादव, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते वासुदेव आचार्य, राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव आणि अन्य प्रमुख नेत्यांना बोलावण्यात आले आहे. संसदीय कामकाज मंत्री पी. के. बन्सल, कृषी मंत्री शरद पवार हे या बैठकीत सरकारचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
विरोधी पक्षांनी महागाईचा मुद्दा लावून धरल्यामुळे सरकारची गोची झाली झाली आहे. महागाईच्या प्रश्नावर जर मतदानाच्या नियमांतर्गत चर्चा केली तर सरकारचा कदाचित पराभव होऊ शकेल, अशी धास्ती केंद्रातील "संपुआ' सरकारला वाटत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यासंदर्भात कॉंग्रेसने आपल्या सदस्यांना संसदेत उपस्थित राहण्यासाठी व्हिप जारी केला होता हे येथे उल्लेखनीय. महागाईच्या मुद्याला तेवढेच जोरकस उत्तर द्यायचे तर सत्तारूढ पक्षाकडे तसा कोणताही मुद्दाच नाही, असे विरोधकांचे म्हणणे आहे. शिवाय विरोधकांनी यासंदर्भात अभूतपूर्व एकजूट दाखवल्याने सरकार धास्तावले आहे. या पार्श्वभूमीवर आता उद्याच्या बैठकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments: